दि. २०/०२/२०२६ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड येथे बहुउद्देशीय व शस्त्रगार इमारतीचे भूमिपूजन मा. आमदार ॲड. श्री राहुलदादा कुल, विधानसभा सदस्य यांच्या हस्ते तसेच श्री. प्रवीणकुमार पडवळ, भा.पो.से., विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
दि. २०/०२/२०२६ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड येथे बहुउद्देशीय व शस्त्रगार इमारतीचे भूमिपूजन मा. आमदार ॲड. श्री राहुलदादा कुल, विधानसभा सदस्य यांच्या हस्ते तसेच श्री प्रवीणकुमार पडवळ, भा.पो.से., विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
सदर कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री सोनवणे, श्री खबिले, श्री काळे, श्री कांबळे व श्री करे तसेच दौंड व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री नंदकुमार ठाकूर, भा.पो.से., उपप्राचार्य श्री रघुनाथ शिंदे व उपप्राचार्य डॉ. श्रीमती भोरे-पाटील, पत्रकार बंधू तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अंतर्गत व बाह्यवर्गीय पोलीस अधिकारी, अंमलदार आणि प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध घटकांतून आलेले २७६ प्रविष्ट चालक पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
आजपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज येथे महाराष्ट्र राज्यातील एकूण २३,५१५ पोलीस प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री नंदकुमार ठाकूर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी प्रमुख अतिथी व मान्यवरांना भविष्यातही विविध विकासकामे राबविण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्याबाबत विनंती केली.
यानंतर प्रमुख अतिथींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. मा. आमदार ॲड. श्री राहुलदादा कुल तसेच श्री प्रवीणकुमार पडवळ, भा.पो.से., विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा यथोचित सत्कार प्राचार्य श्री नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
मा. आमदार श्री राहुलदादा कुल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री नंदकुमार ठाकूर, उपप्राचार्य श्री रघुनाथ शिंदे तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांच्या कार्याचे कौतुक केले. पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज येथे कृतीशील प्रयोगांच्या माध्यमातून तयार होणारे अष्टपैलू पोलीस अधिकारी समाजाचे कर्तव्यनिष्ठेने रक्षण करून महाराष्ट्र पोलीस दलाची शान उंचावतील व “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याला साजेसे वर्तन ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच समाजाचे रक्षण करणारे पोलीस घडविणाऱ्या या प्रशिक्षण केंद्रासाठी भविष्यातही विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक श्री हनुमंत गायकवाड यांनी केले, तर उपप्राचार्य श्री रघुनाथ शिंदे यांनी प्रमुख अतिथी, पत्रकार बंधू व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.















